भाजपाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही पैशांच्या जोरावर जिंकली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार नाना काटे यांनी भाजपावर केला आहे तसेच बंडखोरीचा देखील फटका बसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. नाना काटे यांनी दोन नंबरची मते मिळवली असून त्यांना बंडखोर राहुल कलाटेंचा जोरदार फटका बसला आहे.
हेही वाचा >>> “भाजपाने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली”, पराभवानंतर मविआचे उमेदवार नाना काटेंचं विधान
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीकडे महाराष्ट्राचे लक्ष होते. सर्वपक्षीयांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची होती. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांच्यात थेट लढत होती. आज चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल लागला असून अश्विनी लक्ष्मण जगताप या विजयी झाल्या आहेत. परंतु, ही पोटनिवडणूक पैशांच्या जोरावर भाजपाने जिंकली आहे. आमचा पराभव झालेला नाही. विजयच झाला असे म्हणावे लागेल असे नाना काटे यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, बंडखोर राहुल कलाटे यांचा मोठा फटका बसल्याचे त्यांनी मान्य केले. भाजपाला शेवटच्या दोन दिवसांमध्ये पराभव दिसत असल्याने त्यांनी पैशांचा भडिमार केला. राहुल कलाटे आणि माझ्या मतांची बेरीज केली तर मीच विजयी झालो आहे असं काटे यांनी म्हटलं आहे.