मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी अनेक राजकीय चमत्कार साध्य करत विजय मिळवला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये अनिल भोसले यांनी एकूण ४४० मते मिळवत भाजपचे अशोक येनपुरे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केला. अनिल भोसले यांना एकुण ६९८ मतांपैकी ४४०, संजय जगताप यांना ७१, भाजपच्या अशोक येनपुरे यांना १३३ आणि विलास लांडे यांनी केवळ दोन मते मिळाली. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा मनसे नेत्यांचा आदेश धुडकावून पिंपरीतील चारपैकी तीन नगरसेवकांनी मतदानाचा ‘हक्क’ बजावला होता. पुणे विधानपरिषदेतील अनिल भोसले यांचा हा विजय अनेक अशक्य राजकीय समीकरणे जुळून आल्यामुळे शक्य झाला आहे. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी ३२६ मते आवश्यक होती. मात्र, अनिल भोसले यांना मिळालेल्या मतांची संख्या पाहता काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावून त्यांना मतदान केल्याचे स्पष्ट होते. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडे १२१ मतांचे संख्याबळ होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रसचे उमेदवार संजय जगताप यांना केवळ ७१ मतेच पडली. विद्यमान आमदार अनिल भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी करून त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर लांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचे नाव मतपत्रिकेवर राहिले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा