पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. या घडामोडीमागे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडीबाबत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले.
हेही वाचा – उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा
पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जाबाबत विचारले असता, माझ्या पक्षात सत्यजित तांबेबाबतचे चित्र एकदंरीत काळजी करणारे असून, आम्ही सर्वांनी त्यांचे काम जवळून पाहिले आहे. त्यामुळे, सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा करण्याची गरज होती. त्यातून काही मार्ग काढला पाहिजे होता. अशा प्रकाराचे वाद झाले नसते. पण, कदाचित अजून देखील मार्ग निघू शकतो, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार पुढे म्हणाले की, औरंगाबादची जागा राष्ट्रवादी लढविणार, नागपूरची शिवसेना, तर अमरावती आणि नाशिक काँग्रेस पक्षाने लढवायची, असे आमचे ठरल होते. त्यानुसार आपापले उमेदवार जाहीर करायचे. आमच्याकडून जिथे उमेदवार जाहीर झाले आहेत त्या ठिकाणी कामाला सुरवात देखील झाली आहे. पण, त्याचदरम्यान नागपूर येथे आमच्या एका कार्यकर्त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो कार्यकर्ता उमेदवारी अर्ज मागे घेईल. तसेच, नाशिकबाबत सांगायचे झाल्यास, उमेदवारीवरून जो काही वाद झाला तो बसून सोडविता आला असता. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे (सत्यजित तांबे) ते काही पक्षाच्या बाहेरचे नाहीत. मागील पाच सात वर्षांत त्यांनी लोकांमध्ये मिसळून चांगले काम केले आहे.
हेही वाचा – पुणे : जेवण न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार, हल्लेखोरास अटक
अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते की, काही तरी हालचाली सुरू आहेत. त्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. विधान सभेत पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे, सर्वांनी मिळून थोडसे सामंजस्य दाखवले असते, तर असे घडले नसते. तसेच, बाळासाहेब थोरात हे सामंजस गृहस्थ असून कधीच टोकाची भूमिका घेणार नाहीत.