पुणे : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे शुक्रवारी (६ जानेवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी साडेचार वाजता उद्घाटन होणार आहे.
ज्येष्ठ लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे या संमेलनाचे अध्यक्ष असून विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष आहेत. या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड या देशांमधील मराठी मान्यवर सहभागी झाले आहेत. संत तुकाराम नगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहामध्ये होणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसईच्या वतीने ‘जागतिक मराठी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आमदार जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, उद्योगपती अरुण फिरोदिया आणि बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड या वेळी उपस्थित राहणार आहेत.