राजकीय व्यग्रतेतून वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. कलाकारांच्या सादरीकरणाला शरद पवार यांनी उत्स्फूर्त दाद दिली. गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे संस्थेच्या अमृतमहोत्सवी पदार्पणानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे आयोजित संगीत नाट्यमहोत्सवात मराठी संगीत रंगभूमीची दीर्घकाळ सेवा केल्याबद्दल ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय हरिभाऊ देशपांडे आणि युवा तबलावादक रोहन भडसावळे यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हेही वाचा >>> पुणे: देशात गोडसेंच नाव घेतल तरी जगभरात गांधीजींच नाव- जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव
मराठी रंगभूमी, पुणेच्या अध्यक्षा दीप्ती भोगले, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, उद्योजक सतीश भिडे, नाट्यव्यवस्थापक सत्यजीत धांडेकर, समीर हंपी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, संगीत रंगभूमीबद्दल चिंता वाटावी अशी स्थिती होती त्याकाळी या रंगभूमीविषयी आस्था असलेल्या शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी अतिशय कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार, जयमालाबाई आणि त्यांच्या कन्या लता तसेच कीर्ती यांनी आपल्या कलेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य केले. युवा पिढी संगीत रंगभूमीकडे वळत आहे हे पाहून गंधर्व काळातील संगीत रंगभूमीची उर्जितावस्था पुन्हा पाहावयास मिळेल.