राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा केला तर काँग्रेसने आदर्श घोटाळा केला, दोन्ही काँग्रेसमध्ये घोटाळा करण्याची स्पर्धा असून ‘युवराज’ राहुल गांधी यांनी आदर्शविषयी केलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामांच्या विषयात जनतेची दिशाभूल चालवली असून, राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा कायदा करू, अशी ग्वाही फडणविसांनी या वेळी दिली.
भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार आयोजित ‘वन बूथ टेन यूथ’ या युवा कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार बाळा भेगडे, अमर साबळे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, आदर्श घोटाळय़ात काँग्रेसचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री दोषी आढळून आले. गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना ‘क्लीन चिट’ देऊन अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्याचे काम सरकारने केले आहे. या प्रकरणात अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे दोषींवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. पिंपरीतील अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक होत आहे. निवडणुका जवळ येताच अनधिकृत बांधकामांचे प्रकरण काढायचे, तुमच्यासाठी राजीनामा देतो, असे भासवून ते मागे घ्यायचे अशी नाटके आमदार करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बांधकामांचा विषय मार्गी लावतो, असे म्हणतात. प्रत्यक्षात तशी कृती करत नाहीत. मात्र, महायुतीची सत्ता आल्यास योग्य कायदा करून ही घरे नियमित करण्यात येतील, असा विश्वास फडणवीस यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेस व राष्ट्रवादीत घोटाळय़ांची स्पर्धा – देवेंद्र फडणवीस
पिंपरीतील अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक होत आहे.

First published on: 07-01-2014 at 02:50 IST
TOPICSकाँग्रेसCongressपिंपरी चिंचवडPimpri Chinchwadभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp congress bjp devendra phadanvis pimpri chinchwad