राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात सुरू आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला बसत आहे. त्यामुळे आता आपले अधिक नुकसान करून घ्यायचे नसेल आणि यश मिळवायचे असेल, तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा काँग्रेसनेच लढवल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी करत काँग्रेसच्या प. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर केला.
विधासभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विभागीय स्तरावर संकल्प मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून त्यातील पहिला प. महाराष्ट्राचा मेळावा येथे आयोजित करण्यात आला होता. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्षाचे निरीक्षक मोहन प्रकाश, सचिव शौराज वाल्मीकी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राज्य मंत्रिमंडळातील डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, उपमहापौर बंडू गायकवाड, कमल व्यवहारे, विश्वजित कदम आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
आघाडी अजिबात नको, त्यामुळे काँग्रेसला फटका बसत आहे, अशी भावना सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्यात व्यक्त झाली. काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध राष्ट्रवादी नेहमीच बंडखोरी करते आणि त्यामुळे नुकसान काँग्रेसचे होते. त्यामुळे स्वतंत्रच लढले पाहिजे, अशी मागणी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केली. सांगलीचे (ग्रामीण) अध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, की या आघाडीमुळे पक्ष दुबळा होत चाललाय. पुन्हा आघाडी कराल, तर पुन्हा नुकसान होईल. त्यामुळे वेळीच निर्णय घ्या.
कोल्हापूरचे (ग्रामीण) अध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही राष्ट्रवादीवर टीका करून स्वतंत्र लढण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याचा फटका आपल्याला म्हणजे सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला बसत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी लोकांना बाजूला ठेवा. कोल्हापूरचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, की निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची मी सातत्याने मागणी करतोय; पण तसा निर्णय होत नाही.
पुणे जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना आघाडी धर्म दोघांनी पाळणे अपेक्षित असताना मित्रपक्षाकडून तसे होत नाही, असे सांगितले. आमची मेहरबानी झाली नसती, तर सुप्रिया सुळे देखील निवडून आल्या नसत्या. राष्ट्रवादीची विश्वासार्हता सर्वानाच माहिती आहे. म्हणून या वेळी त्यांनी गद्दारी केली, तर समोरासमोरच लढायची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले. विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनीही यश मिळवायचे असेल, तर काँग्रेसने सर्व जागा लढवल्या पाहिजेत, असे सांगितले. शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक आणि आमदार शरद रणपिसे यांनी सूत्रसंचालन केले.
आता निर्णय करण्याची वेळ – पाटील
आघाडीमुळे गेली पंधरा वर्षे काँग्रेसवर अन्यायच होत आहे. तो धुऊन काढायचा असेल, तर आता निर्णय करण्याची वेळ आली आहे. आघाडीचा धर्म फक्त मंत्रालयात पाळला जातो; पण इतरत्र पाळला जातो का? म्हणून या वेळी सर्व २८८ जागी लढले पाहिजे.
भ्रष्टाचार राष्ट्रवादीचा आणि नुकसान काँग्रेसचे
आता आपले अधिक नुकसान करून घ्यायचे नसेल आणि यश मिळवायचे असेल, तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा काँग्रेसनेच लढवल्या पाहिजेत.
First published on: 25-07-2014 at 03:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp congress meeting demand rally