पिंपरी महापालिकेच्या हद्दीत असलेला चिखली, तळवडय़ातील रेडझोन परिसर देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून या भागाचे विधानसभेत नेतृत्व करणारे आमदार विलास लांडे काहीही करू न शकल्याने हा प्रश्न चिघळला असल्याचा आरोप करत नैतिकता बाळगून लांडेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सानेंनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चिखली तळवडे रेडझोन हद्दीतील नागरिकांना रस्ते, उद्याने, क्रीडांगणे आदी कोणत्याच सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र, मिळकतकराची काटेकोर वसुली केली जाते. अनधिकृत बांधकामांच्या नोटिसाही बजावण्यात येतात. कुठेतरी नागरिकांबाबत दुजाभाव केला जात असून तो अन्यायकारक आहे. पालिकेला नागरी सुविधा पुरवता येत नसतील तर इमारती पाडण्याची कारवाई कशी केली जाते. त्यापेक्षा हा परिसर देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डात समाविष्ट करावा, जेणेकरून तेथील नागरिकांना सुखसुविधा मिळणे सुलभ ठरेल, असे साने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नगरसेवक दत्ता साने पूर्वाश्रमीचे लांडे समर्थक आहेत. मात्र, सद्य:स्थितीत त्यांच्यातून विस्तव जात नाही. विधानसभा निवडणुकीत सानेंनी आपले काम केल्याचे दाखवून शिवसेनेचा ‘बाण’ चालवल्याचा लांडेंना संशय होता. त्यावरून सुरू झालेल्या कुरबुरी पुढे वाढत गेल्या. त्यावरून अनेक नाटय़मय घडामोडीही झाल्या. अलीकडे, चिखलीत झालेल्या कबड्डी स्पर्धेला ‘खो’ देण्याचा प्रकार झाला. लांडेंनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्यावर ‘निशाणा’ साधल्याचा सानेंना संशय आहे. त्यावरून साने व महेश लांडगे यांनी पालिका सभेत बरीच आगपाखड केली होती. आता साने यांनी थेट लांडे यांच्या ‘कार्यसम्राट’ पदालाच आव्हान देत आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.