समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्याच्या भूमिकेमुळे आपल्या मतदारांना त्रास होत आहे. या मुद्यावर चर्चेसाठी वेळ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्यामुळे पक्षात बीडीपीच्या मुद्यावरून पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे, तर शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी तेवीस गावांसह जुन्या हद्दीतही बीडीपीचे आरक्षण असावे अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक पवार यांना भेटले आणि जैववैविध्य उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षणाचा मुद्दा त्यांनी पवार यांच्यासमोर मांडला. त्यासंबंधीचे पत्रही नगरसेवकांनी पवार यांना दिले. तेवीस गावांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असून टेकडय़ांवर बांधकाम परवानगी नाकारण्यात आल्यामुळे गावांमधील नगरसेवक चांगलेच अस्वस्थ आहेत. टेकडय़ांवरील बीडीपीमुळे आपल्याच मतदारांना त्रास होत आहे, असे नगरेसवकांनी पवार यांना पत्रातून स्पष्टपणे सांगितले आहे.
ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर दिलीप बराटे, तसेच सचिन दोडके, बंडू केमसे, विकास दांगट आदींनी बीडीपी आरक्षणाला उघड विरोध केला असून पक्षातील पंचेचाळीस नगरसेवकांचा आमच्या भूमिकेला पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच आमदारांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर बांधकाम होता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका पक्षाच्या शहराध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण यांनी घेतली आहे. तसेच गावांमधील टेकडय़ांना एक न्याय आणि जुन्या हद्दीतील टेकडय़ांना एक न्याय असे असता कामा नये. जुन्या हद्दीतही बीडीपीचे आरक्षण असले पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी नुकतीच जाहीर केल्यामुळे पक्षात पुन्हा एकदा बीडीपीच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झाला आहे.

Story img Loader