पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची वाचाळ वाणी सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पुण्यात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश बापट यांचा तोल पुन्हा ढासळला. ‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले. त्यानंतर राष्ट्रवादीने गिरीश बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पुण्यातील विविध रस्त्यांवर ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचे निवासस्थान’ हा मजकूर असलेले बॅनरच लावले आहेत.
पुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात गिरीश बापट म्हटले, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हटली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हटले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली! विद्यार्थिनींना कळले बघा, शारिरीक आकर्षण नव्हते असे गिरीश बापट शुक्रवारच्या कार्यक्रमात म्हटले. बोलताना जिभेवरचा ताबा सुटल्याचा समाचार सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतलाच, शिवाय राष्ट्रवादीनेही शहरात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
पुण्याचे पालक मंत्री गिरीश बाप यांनी याआधीही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा गिरीश बापट यांचा तोल ढासळला. बापट यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही बापट यांच्यावर टीकेची झोड उठली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने फ्लेक्स लावून गिरीश बापट यांना निषेध केला.
गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. मात्र ते वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत त्याचमुळे त्यांना शिकवणीची गरज आहे म्हणूनच आम्ही हे बॅनर लावले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. तसेच शुक्रवारी त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त आहे त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. गिरीश बापट यांनी राजीनामा दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.