राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री यावा यासाठी पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये १४५ जागा लढवायच्या असून, त्यापैकी १३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनेच राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीच्या २४ विभागीय समन्वयांची बैठक शुक्रवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे हेही या वेळी उपस्थित होते. ‘गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही १२४ जागांवर लढलो होतो. आता १४५ जागांची मागणी करणार आहोत. त्यापैकी १३० जागांवर निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य आहे. स्वबळावर मुख्यमंत्री व्हावे   या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. याचा अर्थ काँग्रेसबरोबर आघाडी होणार नाही असे नाही. परंतु, वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिथे जास्त जागा आल्या आहेत, त्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघांवर आम्ही दावा करणार आहोत. त्यामुळे पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठीही आमचा दावा स्वाभाविक आहे,’ असे वाणी म्हणाले.
मुख्यमंत्री कोण?
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत वाणी यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार तरुण, उमदा व विकास करणारा असेल, असे ते म्हणाले. या पदासाठी अजित पवार हे एकटेच नाहीत, तर जयंत पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे अशी सक्षम फळी पक्षाकडे तयार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाचे विधिमंडळातील आमदार घेतील व शरद पवार अंतिम उमेदवार ठरवतील, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader