प्रकाश खाडे, प्रतिनिधी, जेजुरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांची कोयता आणि कुऱ्हाडीचे वार करुन हत्या करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता मेहबुब पानसरे यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना पुण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहबुब पानसरे हे जेजुरीचे माजी नगरसेवक होते आणि प्रसिद्ध व्यापारी म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
जेजुरी पोलिसांनी याविषयी काय माहिती दिली आहे?
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा मेहबुब पानसरेंवर हल्ला झाला.मौजे धालेवाडी गावाच्या हद्दीमध्ये त्यांनी जमीन घेतली आहे.या ठिकाणी वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी व इतर पाच जणांनी मेहबुब पानसरे व इतर दोघांवर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला केला.या हल्ल्यात पानसरेंच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे पण वाचा श्री जेजुरी देवस्थानचा वाद मिटला, घेतला ‘हा’ निर्णय
सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते मेहबुब पानसरे
मेहबुब पानसरे यांच्यावर शुक्रवारी म्हणजेच ७ जुलैला हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेजुरीतील कार्यकर्त्यांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मेहबुब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. मेहबुब पानसरे यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून कार्यकर्ते प्रार्थनाही करत होते. पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचा जेजुरीत निषेध केला जातो आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर हल्ला कसा काय होऊ शकतो असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. तसंच पानसरे यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते आहे.
मेहबुब पानसरे हे खंडोबा देवाचे मानकरी आणि निस्सिम भक्त होते सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते त्यांच्या पत्नीही माजी नगरसेविका आहेत जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातून ते निवडून येत होते.