मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले असून यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून उद्या हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. त्यातच आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात उद्या संध्याकाळी इफ्तारचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं असून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर देखील उपस्थित असणार आहे.

राज ठाकरे झाले हिंदुजननायक; पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा अधिक; हनुमान जयंतीला तापणार वातावरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे का? असं विचारण्यात आलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितलं की, “आम्ही हा उपक्रम काल आयोजित केलेला नाही. हा उपक्रम मागील ३५ वर्षांपासून आम्ही आयोजित करत असून यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सहभागी होत असतो. इथे येऊन नतमस्तक होतो. यातून राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडतं”.

…बाबासाहेब पुरंदरेंचं ते पत्र १६ वर्षांनी बाहेर का काढलं?; राज ठाकरेंना सवाल

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत मांडलेली भूमिका मान्य नसून समाज एकत्र राहिला पाहिजे. समाजात तेढ निर्माण करणारे विधान करू नये अशी मागणी आहे. तसंच राज ठाकरे यांनी सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर बोलावे,” असंही यावेळी ते म्हणाले.

भाजपाची टीका

“नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी होणार आहे. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रध्देवर घाला आहे. राष्ट्रवादीचा जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा!,” असं ट्विट भाजपाने केलं आहे.

पुण्यातील सोमवार पेठेत असणाऱ्या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वस्तांमार्फत मागील ३५ वर्षांपासून मुस्लिमांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदादेखील हनुमान जंयतीच्या पूर्वसंध्येला रोजा इफ्तार कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध पदार्थ ठेवले जाणार आहेत.

साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराचं वैशिष्टय़ म्हणजे तिथे गणपती आणि हनुमानाची मूर्ती असून आतील बाजूस पीर दर्गा आहे. मुस्लीम पीराचा दर्गा आणि हनुमान मंदिर एकत्रित असल्याने या तालमीला साखळीपीर तालीम म्हटलं जातं. या ठिकाणी विविध समाजातील भाविक दर्शनाला येत असतात आणि इफ्तार कार्यक्रमास हजेरी लावतात.