दांडगा जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण काम करणाऱ्या नेतृत्वाला डावलून ज्या व्यक्तीच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, तोच उमेदवार राष्ट्रवादीने शिरूर लोकसभेच्या माध्यमातून लादल्याने इच्छुक उमेदवार विलास लांडे हे नाराज होणं स्वाभाविक असल्याचं शरद पवार गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विलास लांडे यांच्या नाराजीवर स्पष्ट मत मांडले. अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या भोसरीमध्ये सुट्ट्यांच औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार यावर अनेक चर्चा झाल्या. अखेर शिवसेना शिंदे गटातून थेट राष्ट्रवादीत प्रवेश करणारे शिवाजी आढळराव पाटील हेच शिरूर लोकसभेचे उमेदवार असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ ची पुनरावृत्ती होणार असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे. यामुळे अजित पवार गटातील इच्छुक उमेदवार विलास लांडे हे मात्र नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. याच प्रश्नावर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी विलास लांडे हे नाराज होणे स्वाभाविक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद
हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा
२०१९ ला ऐनवेळी माझ्यासाठी पक्षाने सांगितल्यानंतर माघार घेतली, माझ्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. विलास लांडे यांचा दांडगा जनसंपर्क असून सातत्यपूर्ण काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या वीस वर्षांपासून ज्या व्यक्तींच्या विरोधात विलास लांडे हे काम करत आहेत. त्याच व्यक्तीला शिरूर लोकसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीने आयात केले आहे. असं असल्यास विलास लांडे हे नाराज होणं स्वाभाविक असल्याचं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर संसद रत्न पुरस्कारावरून अमोल कोल्हे यांच्यावर टीका करणाऱ्या शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर देखील अमोल कोल्हे यांनी टीका केली. शिवाजी आढळराव पाटील हे तीन टर्म खासदार होते. त्यांनी अशा पद्धतीने बोलणं योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.