पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘घरकुल’ प्रकल्पातील घरांचे तातडीने वाटप करण्यात यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी लाभार्थ्यांनी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. आठ दिवसांत ताबा न दिल्यास घरात घुसण्याचा पवित्रा संघटनांनी घेतल्याने या विषयावरून राजकारण सुरू होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
घरकुलच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कष्टकरी कामगार संघटनेचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालिका मुख्यालयात मोर्चा आणण्यात आला. सभेचे कामकाज सुरू होण्यावेळी आंदोलकांनी प्रवेशद्वाराजवळ धरणे धरले. त्यामुळे नगरसेवकांना सभागृहात जाण्यात अडथळे येत होते. त्यांना मागच्या दारातून आत सोडण्यात आले. सभेचे कामकाज बंद पाडण्याचा आंदोलकांचा निर्धार होता. मात्र, पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. येत्या आठ दिवसांत घरांचा ताबा न दिल्यास घरांमध्ये घुसून ताबा मिळण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत थंड पडलेला हा विषय पुन्हा तापण्याची चिन्हे असून राष्ट्रवादीसमोरील डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader