कसबा विधानसभापोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने लढवावी, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, असा ठराव पक्षाच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पाच इच्छुकांची नावेही पक्षकडून प्रदेशकडे पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. काँग्रेस विश्वासात न घेता हवे तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
हेही वाचा >>> दूध दरात दोन रुपयांनी वाढ; महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीत कसबा मतदार संघ बहुतांश वेळा काही अपवाद वगळता काँग्रेसच्याच वाट्याला आला. ऑक्टोबर २०१९ च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसनेच ही निवडणूक लढवावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक भूमिका बदलत पोटनिवडणूक लढविण्याचा ठराव पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने मंजूर केला. हा ठराव पक्षाच्या प्रदेश नेत्यांना पाठविण्यात आला आहे. यात एकूण दहा नावांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता अंकुश काकडे, ॲड. रूपली पाटील-ठोंबरे, वनराज आंदेकर यांच्यासह दहा जणांची नावे प्रदेश समितीकडे पाठविली आहेत.
हेही वाचा >>> पुणे :‘कसब्या’साठी काँग्रेसकडून १६ इच्छुक; उमेदवारांच्या दूरचित्र संवाद पद्धतीने मुलाखती
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या ॲड रूपाली पाटील-ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखविली होती. टिळक यांच्या निधनाला पाच दिवसच झाले असताना ही मागणी पुढे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रूपाली पाटील यांची कानउघाडणी केली होती. राज्याची राजकीय संस्कृती अशी नाही, अशा शब्दात त्यांनी निवडणुकीबाबत भाष्य केले होते. त्यानंतर कसब्याची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णयही राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीत घेतला होता.
काँग्रेसने विश्वासात न घेता परस्पर तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी ताकद आहे. त्यामुळेच पोटनिवडणूक लढविण्याचा ठराव प्रदेशच्या नेत्यांना पाठविला आहे. प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस