राज्यपाला भगतसिहं कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवर आज (सोमवार) पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
या वेळी प्रशांत जगताप म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन, केंद्रात भाजपाची सत्ता आली आहे. पण सतत भाजपाच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल विधान केले आहे. त्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच, येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमास येणार आहेत. त्यावेळी त्यांच्याबरोबर राज्यपाल कोश्यारी हे देखील असणार आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमा अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू.”
तसेच ते पुढे म्हणाले की, ”आजवर ज्या ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल विधान केलं आहे. अशा व्यक्तींना जनतेने धडा शिकवला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी एकच वाटतं की, असा राज्यपाल पुन्हा राज्याला मिळून नये.”