लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या रॅप गाण्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. मात्र,आता या गाण्याला आणि रॅप गाणे केलेल्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसनेच पाठिंबा दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आणि मुख्य इमारतीत चित्रित केलेल्या रॅप गाण्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांत प्रदर्शित झाली. मात्र या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन या गाण्याचे विद्यापीठात चित्रीकरण करण्यास विद्यापीठ प्रशासनाने परवानगी कशी दिली असा आक्षेप घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर या गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करत विद्यापीठाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रॅप गाणे केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला होता.
हेही वाचा…. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात रॅपगीत चित्रित करणाऱ्या तरुणाच्या विरुद्ध गुन्हा
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पाठिंबा दिला. रॅप गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणाऱ्या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहील. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणारी रॅप गाणी तयार करत आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबीयांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो, म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत, असे पाटील यांनी नमूद केले.
हेही वाचा…. मित्रांवर प्रभाव पाडण्यासाठी पिस्तुलातून खडकवासला धरण परिसरात गोळीबार
विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विद्यापीठात रॅप गाणे चित्रित झाल्याचा प्रकार उघडीस आल्यावर विद्यापीठाने चित्रीकरणाची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत, तसेच विद्यापीठात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. असे असूनही विद्यापीठाची परवानगी न घेता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठातील कोणी कर्मचारीच यात सामील आहे का, असल्यास संबंधितावर काय कारवाई केली जाणार असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.