नथुराम गोडसे हा पहिला अतिरेकी होता ज्याने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या. त्याने अतिरेकी विचारांना खतपाणी घातलं. आजही नथुरामांची पिलावळ जिवंत आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना जगातला पहिला सामाजिक ज्ञान असलेला राजा होता असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधले होतं असं आव्हाडांनी सांगितलं. ओबीसींना तेव्हाच आरक्षण मिळालं असतं तर ७५ टक्के जनसमुदाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर गेला असता असंदेखील ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ओबीसींच आरक्षण जातंय, आरक्षणामुळे कित्येक ओबीसींची मुलं तहसीलदारावरून जिल्हाधिकारी झालीत. उद्या आरक्षण गेलं ना मग समजेल स्पर्धा काय असेल. आम्ही आमचा पूर्व इतिहास विसरलो आहोत. आपण समाजाबरोबर आहोत असं समजत आहोत. ही व्यवस्था तुमच्यासाठी नाही. ही व्यवस्था आज ना उद्या अशी दाबून टाकेल की परत कधीच वरती येऊ शकणार नाहीत.

“बाबासाहेबांचं आरक्षणाबाबत मोठं योगदान आहे.  बाबासाहेब यांच्या मनात नेहमी खंत होती की मी ओबीसींना आरक्षण देऊ शकलो नाही. माझं असं मत आहे की, बाबासाहेबांच्या विचारांनी नेहरूंनी ओबीसींना आरक्षण दिलं असत तर बाबासाहेब या देशाचे अनभिषिक्त सम्राट झाले असते. तेव्हापासून ओबीसींची संख्या ५० टक्क्यांच्या खाली गेलेली नाही. पन्नास टक्के ओबीसी, १२-१५ टक्के अनुसूचित जाती, ८ ते १० टक्के आदिवासी हे सर्व एकत्र केले असते. ७५ टक्के जनसमुदाय बाबासाहेब यांच्याबरोबर गेला असता,” असं आव्हाड म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “शिवचरित्रकार पुरंदरे यांनी लिहिलं आहे की दादोजी कोंडदेव गुरू होते. त्याकाळी जेव्हा त्यांना काही माहिती नव्हत महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात आई जिजाऊ यांचा प्रभाव होता. काय त्या दादोजी कोंडदेव यांचा संबंध?”.

Story img Loader