उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे केलेल्या ‘त्या’ विधानांमुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची भलतीच पंचाईत झाल्याचे सोमवारी दिसून आले. पक्ष तसेच पालिका पदाधिकाऱ्यांनी याविषयी मौन पाळणेच पसंत केले. अजितदादांनी, असे बोलायला नको होते, अशी भावना मात्र व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे, विविध संस्था संघटनांनी अजितदादांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने करून आपला राग व्यक्त केला.
इंदापूरच्या सभेतील अजितदादांच्या भाषणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. अजितदादांचा राजकीय बालेकिल्लाही त्यास अपवाद नव्हता. राष्ट्रवादी वगळता अन्य संस्था, संघटनांनी अजितदादांचा तीव्र निषेध केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून येत होते. त्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करता येत नव्हते आणि उघडपणे त्यांच्या विरोधी बोलताही येत नव्हते. त्यामुळे कोणतेही भाष्य न करता मौन बाळगणेच त्यांनी पसंत केले. मात्र, अजितदादांसारख्या मोठय़ा नेत्याने असे बोलायला नको होते, अशी भावना मात्र बहुतांश पदाधिकारी व्यक्त करत होते. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली दापोडी येथे निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीला सत्तेचा माज असून अजितदादांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांचे वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे, असे एकनाथ पवार यावेळी म्हणाले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनीही अजितदादांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.