राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर न केल्यास उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार व मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी घेतली होती. बुधवारी आचारसंहिता लागू झाली. मात्र, याबाबतचा कोणताही निर्णय न झाल्याने जगतापांनी तोच नकाराचा सूर पक्षनेतृत्वासमोर आळवल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा बहुतांश भाग मावळ मतदारसंघात समाविष्ट आहे. शिवसेनेकडून ‘मावळ’ खेचून आणण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची योजना आहे. त्या दृष्टीने जगताप यांना विधानसभेऐवजी लोकसभेच्या रिंगणात उतरवत अजितदादांनी मावळची बांधणी सुरू केली होती. लोकसभा लढण्यास तयारी दर्शवण्यापूर्वी जगतापांनी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच अजितदादांना अनधिकृत बांधकामे नियमित न झाल्यास उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट घातली होती. बुधवारी सकाळी आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले. अपेक्षेप्रमाणे जगतापांनी मावळमधून लढण्यास पक्षनेतृत्वाकडे नकार कळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. माजी महापौर संजोग वाघेरे यांचे नाव पुढे आले आहे. उमेदवारीवरून नाटय़मय घडामोडी सुरू असल्या तरी अधिकृत भाष्य करण्यास कोणीही तयार नाही.

Story img Loader