पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करणार आहे, असे सांगितले आहे. मात्र अमोल मिटकरींच्या या भूमिकेला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. पुणे शहराला राजमाता जिजाऊ यांचे नाव देणे उचित होणार नाही, अशी भूमिका हिंदू महासंघाने घेतली आहे. याच मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच नावे चांगली आहे. कोणाचाही अनादर करण्याचे कारण नाही. पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे. त्यामुळे सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे अजित पवार म्हणाले आहेत. ते आज (१४ जानेवारी) माध्य प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
पुणे शहर आता कुणा एकाचे राहिलेले नाही
“सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रचंड प्रश्न आहेत, हे प्रश्न असताना नवीन नवीन प्रस्ताव पुढे येतात. त्यावर आमच्यासारख्या राजकीय नेत्याला बोलणे अवघड होते. कारण तो भावनिक विषय असतो. सध्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर चर्चा करून विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. मूळ पुणेकरांना काय वाटते याचाही विचार करावा लागेल. उगीचच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचं ठरतं. कोणाचाही अनादर होणार नाही. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. पिंपरी चिंचवडलाही पुण्याचाच भाग समजले जाते. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि मूळ विषय भरकटवायचे असे सुरू आहे. माझी विनंती आहे की सर्वांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा >> सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “बाळासाहेब थोरातांना आधीच…”
अमोल मिटकरी यांनी काय मागणी केली?
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा >> “फडणवीसांनी संकेत दिले होते, पण..,” शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीवर शिवसेनेचे महत्त्वाचे भाष्य
हिंदू महासंघाचा नामांतरास विरोध
तर पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध केले आहे. “जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे,” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.