शिवसेनेचा १९ जूनला वर्धापन दिन आहे. त्यापार्श्वभूमीवर वरळीत शिवसेनेचं ( ठाकरे गट ) शिबिर पार पडलं. या शिबिराला हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावे तिकडे, भावी मुख्यमंत्री. पण, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. हे राजकारण आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी ‘शिल्लकसेना’ म्हणून डिवचलं, ठाकरे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “होय, खरेच ही…”

“मुंबई महापालिका आम्ही जिंकू”

“महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर आम्ही १४५ आमदार निवडून आणू. मुंबई महापालिका आम्ही जिंकू,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : मनिषा कायंदेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “एक पाय तुटल्याने गोम…”

“…तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं”

बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत तिघे एकत्र आल्याशिवाय भाजपा आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, ‘आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे.’ तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय.”

Story img Loader