चिंचवड आणि कसबा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज ( १३ फेब्रुवारी ) चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंवर टीकास्र डागलं. बेडकाला वाटतं मीच फुगलो आहे. पण, ते फुगलेपण काही खरं नसते, असा टोला अजित पवारांनी राहुल कलाटेंना लगावला आहे.
“ज्यांचा अर्ज राहिला आहे, तो राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे, सचिन अहिर आणि प्रत्येकजण प्रयत्न करत होतो. कोणीही अपक्ष राहू नका सरळ लढत होऊद्या. कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपात सरळ लढत आहे. सांगत होते की, एक लाखांच्यावर मतं पडली. पण, ती शिवसेनेची मते होती,” असा टोमणा अजित पवारांनी कलाटेंना लगावला.
हेही वाचा : अश्लील लावणीचा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा अजित पवारांचा इशारा; गौतमी पाटील म्हणाली, “दादा…”
“बेडकाला वाटतं मी फुगलो आहे. मात्र, ते फुगलेपण काही खरं नसते. यात बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे. कोणतरी सांगितलं, अर्ज काढू नको. विरोधकांना वाटलं असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर आपणांस निवडणूक सोप्पी जाईल. परंतु, कृपा करून कोणी रूसु आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणायची आहे,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.