पुणे प्रतिनिधी: अजितदादा मंत्रालयात असून माझ्या बिचार्‍या दादाचे असे झाले आहे की काहीही झाले तरी माझ्या भावावर त्याचे खापर फोडले जाते. पण मार्केटमध्ये जे नाणे चालते. त्याचीच जास्त चर्चा सुरू असते. त्यामुळे मला एक गोष्ट आठवते. ती म्हणजे भूकंप झाला तर तो पवारसाहेबांनी केला. पण त्या भूकंपामध्ये बिचार्‍या पवारसाहेबांची काय चूक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार ‘नॉट रिचेबल’ असून ४० आमदार नाराजदेखील आहेत. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे या पुण्यातील ‘वेताळ टेकडी’ची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

आणखी वाचा- “आर.टी.ई शुल्कावरून पालक-शाळांमध्ये वाद”, समाजवादी शिक्षण हक्क सभेची सरकारकडे प्रतिपुर्तीची मागणी

या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अजितदादाचे ट्विटर आणि फेसबुकच पाहिले नाही. ते पाहून त्यावर भूमिका मांडते. तसेच ४० आमदार कोणत्या बाबतीत नाराज आहेत. तुमचे लग्न झाले आहे का, असा प्रश्न समोरील एका पत्रकाराला विचारला. त्यावर एकच हंशा पिकला. मी नाते का लावते. तर बायको नाराज झाल्यावर सोडून जाते की, रुसून बसते. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला जर काही तथ्य असेल तर मी नक्कीच नाराज असलेल्या ४० आमदारांसोबत चर्चा करीन, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मी नेहमी सर्व आमदार आणि खासदार यांच्या संपर्कात असते. तसेच पवारसाहेब, अजितदादा आणि जयंत पाटील हे देखील २४ तास सर्वांच्या संपर्कात असतात. त्यामुळे जर एखादा कोणी नाराज असता, तर ते आमच्या कानावर निश्चित आले असते. त्यामुळे एकूणच आमच्या कोणाच्याही मनात शंका नसून टीव्हीवर ती जास्त वाटत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आणखी वाचा-‘त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, मलिकांच्या दाव्यानंतर पवारांचे टीकास्त्र

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला. त्यामध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेला महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे. या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली. तुम्ही कुटुंबातील व्यक्तीची किंमत पैशात मोजू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘वेताळ टेकडी’च्या प्रकल्पाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘वेताळ टेकडी’वर पुणे महापालिकेमार्फत होणार्‍या प्रकल्पास स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच संवेदनशीलपणे ऐकले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader and mp supriya sule open up obout ajit pawar svk 88 mrj
Show comments