पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच नैसर्गिक हक्क असून, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास खूपच आनंद आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महायुतीकडून मुख्यमंत्री पदाबाबत न घेतलेला निर्णय, मंत्रीपदे अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

हेही वाचा : देशात लोकशाहीचे वस्त्रहरण; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे उपोषण

मागच्या वेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटले होते. पण त्यांनी पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर आनंदच झाला असता. मात्र या वेळी ज्यांचे १३२ आमदार आहेत, त्यांचाच मुख्यमंत्री होणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्याला ओबीसी मुख्यमंत्री मिळण्याची मागणी केली जात असल्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता भुजबळ म्हणाले, की ओबीसी मुख्यमंत्री होण्यापेक्षा ओबीसी, मागासवर्गीय समाजाचे संरक्षण करणारं मुख्यमंत्री व्हावे असे वाटते.

हेही वाचा : हेल्मेटसक्तीचा आता नवा नियम… कशी आणि कोणावर होणार कारवाई?

म्हणून मताधिक्य कमी झाले…

ईव्हीएमबाबत होत असलेल्या टीकेसंदर्भात भुजबळ म्हणाले, की ईव्हीएममुळे विजय झाला असल्यास मलाही एक लाख मते मिळायला हवी होती. मात्र, माझे मताधिक्य कमी झाले आहे. जरांगे हे माझ्या मतदार संघात सकाळी दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत फिरले आणि त्यांनी जातीयवाद पसरवण्याच काम केला. त्यामुळे माझे मताधिक्य कमी झालं आहे. नेहमी मला मिळणारे ५६ ते ६० हजारचे मताधिक्य ते आता निम्म्यावर आले आहे.