भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपाचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
यानंतर आता भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसताना ते प्रचाराला उपस्थित राहिले आहेत. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन भाजपा नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.ते मागील अनेक दिवसांपासून एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.
या संपूर्ण प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी टीका जगताप यांनी केली. तसेच गेल्या पाच वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गिरीश बापट यांचा समावेश करण्यात आला नाही, पण आता कसबा निवडणुकीच्या वेळी बापटांची भाजपाच्या नेतृत्वाला आठवण आली, अशी टीका जगताप यांनी केली.
एक व्हिडीओ जारी करत प्रशांत जगताप म्हणाले, “कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट प्रचारासाठी उतरले आहेत. मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली.”
हेही वाचा- ‘श्वास घ्यायला त्रास अन् नाकात ऑक्सिजन नळी’, भाजपाच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट मैदानात
“मागील पाच वर्षापासून भाजपाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतून गिरीश बापट यांना बाजुला का ठेवण्यात आलं? भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात, मेळाव्यात गिरीश बापट यांचा साधा फोटो लावण्याचं औदार्यही भाजपाने दाखवलं नाही. पण आज कसबा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला गिरीश बापट यांची आठवण झाली. हे एकूणच भाजपाच्या पराभवाचं लक्षण आहे. गिरीश बापट यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. हे पुणेकर कधीही विसरणार नाहीत,” अशी टीका जगताप यांनी केली.