राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपिता म्हटल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीस यांना समज घालावी अशी मागणीही रुपाली ठोंबरेंनी केली आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी मुद्दाम अशी वक्तव्य अमृता यांच्याकडून केली जातात की काय अशी शंका वाटते, असंही रुपाली ठोंबरेंनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे.

“अमृता वहिनी का बरळतात तेच मला कळत नाही. देवेंद्र फडणवीसाहेब त्यांना का नाही थांबवत? त्या एका जबाबदार व्यक्तीच्या पत्नी आहेत. माजी मुख्यमंत्री, माजी विरोधीपक्ष नेते आणि आता तर उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्याच्या त्या पत्नी आहेत,” असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रपिता कोण होऊ शकतं तर ज्यांनी राष्ट्रासाठी बलिदान आणि योगदान दिलं आहे. तुम्ही मोदीसाहेबांना तुमच्या पित्यासमान म्हणा आम्हाला अडचण नाही. कोणीही एखाद्या व्यक्तीला पित्यासमान असल्याचा दर्जा देऊ शकतो. मात्र राष्ट्रपिता हे दर्जा देण्याचं काम हे जाणीवपूर्वक पद्धतीने केल्यासारखं वाटतं,” अशी शंकाही रुपाली ठोंबरेंनी ‘टीव्ही ९ मराठी’ उपस्थित केली.

“पतीच्या सरकारचं कोणतचं विकासाचं काम पुढे येत नसल्याने हे विधान प्लॅनिंगमधील, प्रचारामधील भाग आहे की काय कळत नाही. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे विधान केलं आहे का कळत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की तुमच्या बायकोला, अमृता मामीला तुम्ही थोडं आवरलं पाहिजे. सातत्याने तुम्ही समाजात या गोष्टी बोलणार असाल तर चिंतेची बाब आहे. राज्यपाल बोलले जुने नवीन छत्रपती महाराज. आता मामी म्हणतात जुने, नवीन राष्ट्रपिता. या प्रश्नावरुन तुम्ही महाराष्ट्राचा विकास साधणार आहात का? याचं उत्तर मला देवेंद्र फडणवीससाहेबांनी किंवा ईडी (एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस) सरकारने द्यावं,” असं ठोंबरे म्हणाल्या आहेत.

नक्की वाचा >> “बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा

“का सातत्याने नको ते प्रश्न उपस्थित करताय? तुम्ही बोलल्यानंतर आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागतं. आमचाही वेळ वाया जातो. देवेंद्र फडणवीसाहेबांनी आमृता वहिनींना थोडंसं ठणकावून सांगितलं पाहिजे की तू विकासाच्या बाबतीत बोल, वाहतुकीच्या बाबतीत बोल, महाराष्ट्राच्या सुविधांबाबत बोल.
मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की शरीरविक्रेय व्यवसाय कायदेशीर केला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी कायदेशीपद्धतीने चालूच शकत नाही अशाच गोष्टी त्या जाणीवपूर्वकपणे बोलतात. मग असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांची बायको डोक्यात थोडी कमी आहे का? शिकलेल्या नाहीत का? का त्या सतत्याने असं बोलतात असे प्रश्न आमच्या मनात निर्माण होतात,” असा टोला ठोंबरे यांनी लगावला.

आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं मत अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरुनच रुपाली ठोंबरेंनी ही टीका केली आहे.

Story img Loader