शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला. तसेच तक्रारदार महिलेला फुस लावली जात आहे, असाही दावा शेवाळेंनी केला. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहात. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?” असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला. त्या रविवारी (२५ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद पूर्ण ऐकून मी त्या पीडित मुलीबरोबर पोलिसांसमोर पत्रकार परिषद घेणार आहे. मुळात हे प्रकरण झालं तेव्हा महाविकासआघाडी सत्तेत होती. हे शिवसेनेचे खासदार होते. मला वाटतं एखाद्या खासदाराने वैयक्तिक अनैतिक संबंधांमध्ये दाऊद, एनआयए आणणं म्हणजे बिकट परिस्थिती आहे.”

“शेवाळेंनीच देशाच्या हिताची गोपनीय माहिती त्या महिलेला सांगितली नसेल ना”

“खासदार राहुल शेवाळेंचं ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते तिचा दाऊदशी संबंध आहे असं मानलं, तर मग शेवाळेंनीच त्या संबंधामध्ये असताना देशाच्या हिताची गोपनीय माहिती तिला सांगितली नसेल ना. ती माहिती तिने पुढे दाऊदला दिला असेल. हे विचारणं भाग आहे,” असं मत रुपाली ठोंबरेंनी व्यक्त केलं.

“खासदार शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं”

“राहुल शेवाळे खासदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं. असं असताना ते सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. आम्ही मुर्ख नाही,” असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी शेवाळेंवर हल्लाबोल केला.

“शेवाळेंनी ऐकवलेला व्हिडीओ दोन वकिलांमधील”

रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, “शेवाळेंनी जे व्हिडीओ ऐकवले ते दोन वकिलांमधील व्हिडीओ आहेत. एक शेवाळेंचा वकील आणि एक पीडितेचा वकील आहे. ते वकील काय बोलले ते राहुल शेवाळे किंवा पीडित महिलेवर लादलं जाऊ शकत नाही. दोन वकील हे प्रकरण निकाल काढण्यासाठी काहीही बोलू शकतात.”

“पीडित महिलेच्या जीवाला राहुल शेवाळेंपासून धोका”

“पीडित महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिच्या जीवाला राहुल शेवाळेंपासून धोका आहे. उद्या ती सर्वांच्या समोर आली आणि तिचा काही घातपात झाला, तर त्याला जबाबदार राहुल शेवाळे आणि त्याचं कुटुंब असेल. कारण ते सातत्याने पीडितेने माध्यमांसमोर बोलू नये, तिने न्यायालयात येऊन तक्रार देऊ नये असा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप रुपाली ठोंबरेंनी केला.

हेही वाचा : अत्याचाराची तक्रार करणाऱ्या महिलेचा दाऊद गँगशी संबंध? राहुल शेवाळेंच्या दाव्याने खळबळ, नवाब मलिकांचे नाव घेत म्हणाले…

“मुळात राहुल शेवाळेंनीच शेण खाल्लं नसतं, तर…”

“हा एका खासदाराच्या नैतिक संबंधाचा प्रकार आहे. हे म्हणतात पीडितेला युवासेनेचे लोक फॉलो करतात. मात्र, कोणी कोणाला फॉलो करावं किंवा करू नये असा कायदा नाही. हे सांगणारे कोण आहेत? मुळात राहुल शेवाळेंनीच शेण खाल्लं नसतं, तर त्यांना दाऊद, एनआयए या गोष्टी आठवल्या नसत्या. देशाची सुरक्षा आणि यांचे विवाहबाह्य संबंध एकत्र करू शकत नाही,” असंही रुपाली ठोंबरेंनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rupali thombare answer shinde faction mp rahul shewale over rape allegations pbs