राज्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकरी वर्गाला पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. भाजप सरकारने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. राज्यभर जलयुक्त शिवारामधून चांगल्या प्रकारे कामे झाल्याचे हे सरकार सांगते. तरी देखील पाण्याची पातळी कमी कशी झाली, असा सवाल करत या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपा सरकारकडून राज्यातील अनेक भागात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यात आल्याचे सांगितले जाते. इतकी कामे होऊनही शेतकरी वर्गाला पाणी समस्येला सामोरे जावे लागते. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, ते कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यभरात मोठ्याप्रमाणावर जाहिराती करण्यावरच हा पैसे खर्च झाला, असावा अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच चारा छावण्या सुरू काराव्या लागतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.