Dattatray Bharne : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाला. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा अद्यापही सुरु आहे. असं असतानाच खातेवाटप होऊन एवढे दिवस झाले तरीही अद्याप काही मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे काही मंत्रीही नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांवर आता दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपण मंत्रिपदाचा पदभार अद्याप का स्वीकारला नाही? याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. याबरोबरच माध्यमांशी बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
नाराजीच्या चर्चांवर दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसल्याच्या चर्चांसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “मी बाहेर (परदेशात) होतो. आता पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे, मी नाराज नाही. मी १० वर्ष परदेशात गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराजीच्या चर्चा रंगल्या. या नाराजीच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.
पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत भरणे काय म्हणाले?
“पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काहीही रस्सीखेच नाही. सर्व तुमच्या मनासारखं होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणू द्या, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील”, असं मोठं भाष्य दत्तात्रय भरणे यांनी केलं.
दत्तात्रय भरणे यांचं विजयस्तंभाला अभिवादन
कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनानिमित्त मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनानिमित्त प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा देखील घेतला आहे. वाहतुकीच्या नियोजनापासून ते विजयस्तंभाला अभिवादन करण्यापर्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. तसेच आपण अजूनही कुठे कमी पडतोय का? हे पाहून भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच भविष्यात आर्थिक मदत देण्याचा प्रयत्नही असेल”, असंही दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.