नारायणगाव : पुणे शहरातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे – नाशिक महामार्गावरील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात ( दि.२३ ) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दोन जणांना उडविले. त्यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला . हा अपघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड- आळंदीचे आमगार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते याच्या फॉर्च्युनर गाडीने केल्याचे उघडकीस आले आहे .
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते याच्या फॉर्च्युनर गाडीने ओम उर्फ बंटी सुनील भालेराव (वय १९ रा. कळंब , सहानेमळा , ता. आंबेगाव , जिल्हा – पुणे ) हा तरुण जागीच ठार झाला आहे. अपघातानंतर मयूर मोहिते मदत न करता पळ काढण्याच्या प्रयत्न केला , मात्र एका स्थानिक ग्रामस्थाने त्याच्या फॉर्च्युनर गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावली. या प्रकारानंतरही मयूर मोहिते गाडीतून उतरण्यास तयार नव्हता. स्थानिक तरुणांनी धारेवर धरल्यानंतर मयूर मोहिते गाडीतून खाली आला, असे ग्रामस्थांनी सांगितले .
हेही वाचा : सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलावर गोळीबार?
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार , जुना पुणे – नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा त्याच्या ताब्यातील फॉर्च्यूनर गाडीने (क्रमांक एम एच १४ के जे ७५५७ ) कळंब बाजूकडून मंचरच्या दिशेने भरधाव वेगाने चालला होता. त्याचवेळी कळंब गावच्या हद्दीतील सहाने मळ्यात राहणारा ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा मोटरसायकलवरून कळंब गावाकडे चालला होता. एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोहिते यांच्या फॉर्च्युनर गाडीने दुचकीला जोरदार धडक दिली . दुचाकी चालक ओम सुनील भालेराव या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर मयूर मोहिते हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र एका स्थानिक ग्रामस्थाने फॉर्च्युनर गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावली. या प्रकारानंतरही मयूर मोहिते गाडीतून उतरण्यास तयार नव्हता. स्थानिक तरुणांनी धारेवर धरल्यानंतर मयूर मोहिते गाडीतून खाली आला असे ग्रामस्थांनी सांगितले . या अपघाताची माहिती स्थानिक रहिवाशी शुभम भालेराव, शैलेश भालेराव, सचिन वायाळ यांनी पोलिसांना माहिती दिली.
जखमी ओम भालेराव उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने कळंब परिसरात खळबळ उडाली. अपघातात ठार झालेला ओम भालेराव हा एकुलता एक मुलगा होता. त्याचा स्वभाव हसरा व मनमिळावू होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता ओम भालेराव याच्यावर कळंब येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक
या अपघाताची फिर्याद नितीन रामचंद्र भालेराव यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे करत आहेत.
हेही वाचा : पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात पुन्हा भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू
आमदार मोहिते यांची प्रतिक्रिया
“माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट ही १०० टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून वातावरण शांत झालं की मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि करणार नाही”, असे आ. दिलीप मोहिते पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना प्रसार माध्यमांना सांगितले.