लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असेलेले राष्ट्रवादी आमदार रमेश कदम यांना अखेर सोमवारी पहाटे पुण्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील ‘ग्रँड ह्यात’ या पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून सीआयडीचे पथक रमेश कदम यांच्या मागावर होते. कदम यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी सीआयडीने छापे देखील घातले. परंतु ते सापडत नव्हते. अखेर आज सीआयडीच्या पथकाला यश आले. रमेश कदम यांना अटक करण्यात आली त्यानंतर हे पथक त्यांना घेऊन नवी मुंबईला आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. सोमवारी दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मंजूर केली.
काय आहे हे प्रकरण?-
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात अध्यक्ष असताना कायदा धाब्यावर बसवून कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत आमदार कदम यांच्या विरोधात मुंबईत दहिसर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाला असताना त्याच दिवशी आमदार कदम हे सोलापुरात एका पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडत होते. परंतु पोलीस आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला होता. तेव्हापासून ते फरार होते.
संबंधित बातम्या-
आमदार कदमांकडून भेट मिळालेली मोटार पोलिसांकडे
घोटाळ्याची रमेश कदम यांची कबुली
अण्णा भाऊ साठे महामंडळात घोटाळा चूकच