चिंचवडच्या तालेरा रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावरून मोक्याच्या क्षणी राजकीय वादंगास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या माजी महापौर अपर्णा डोके यांचा उद्घाटन कार्यक्रमासाठी पुढाकार असताना, याच प्रभागातील दुसरे नगरसेवक व मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी, ही वास्तू अपूर्णावस्थेत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली असताना उद्घाटनासाठी इतकी घाई का, असा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
‘तालेरा’चे बांधकाम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. अद्याप रूग्णालयाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला नाही. अतिदक्षता विभागाचे कामही अपूर्ण आहे. रूग्णांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यास रूग्णालय सक्षम नाही, तरीही उद्घाटनाची घाई का केली जात आहे. सगळी कामे पूर्ण झाल्याशिवाय रूग्णालयाचे उद्घाटन करण्यात येऊ नये, असे मुद्दे कोऱ्हाळे यांनी या वेळी मांडले.
डोके व कोऱ्हाळे वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असून प्रभागातील अनेक कामांमध्ये त्यांच्यात मतभेद झाल्याची उदाहरणे आहेत. ‘तालेरा’च्या विस्तारीकरणाचे काम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. उद्घाटनाचे कामही त्यांच्याच सांगण्यानुसार होत आहे. अशात, कोऱ्हाळे यांनी वेगळा सूर काढल्याने त्यांच्यातील मतभेदांचे पुन्हा प्रदर्शन झाले आहे.

Story img Loader