खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर बैलगाडापुढे घोडीवर स्वार होऊन घाट गाजवला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन त्यांनी यानिमित्ताने पूर्ण केलं आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हे हे दिलेला शब्द पाळणार का? असा खोचक टोला महाविकास आघाडीतीलच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला होता. अमोल कोल्हे यांनी यातून आढळरावांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळमधील नाणोली, आंबेगाव येथील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यती पार पडत आहेत. आज (१६ फेब्रुवारी) खेडमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाड्या पुढे घोडेस्वारी केली.

व्हिडीओ पाहा :

यावेळी बैलगाडा शौकीन आणि प्रेमींमध्ये एकच जल्लोष सुरू होता. काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे बैलगाडी पुढे घोडेस्वारी करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारत टोला लगावला होता.

शिवाजी आढळराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले होते, “खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण दिलं होतं. कोणावर टीका करून तोंड खराब करायचं नाही. काही पत्रकार विचारत होते, सध्याच्या खासदारांना निमंत्रण दिलं का? हो त्यांना जाहीर निमंत्रण दिलं की बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीत या.”

“प्रचारादरम्यान अमोल कोल्हे म्हणाले होते की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या,” असा खोचक टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लगावला आहे. 

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले होते?

अमोल कोल्हे म्हणाले होते, “हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.” 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe participate in horse race in pune kjp pbs
Show comments