जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करतानाच जाहिरात फलनांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहवाल मागवून संबंधित यंत्रणांना अनधिकृत जाहिरात फलक काढण्याचे आदेश द्यावेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे: दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू… जाणून घ्या सविस्तर माहिती
हिंजवडी येथे झालेल्या वादळी पावसात लोखंडी जाहिरात फलक कोसळला. जाहिरात फलक अधिकृत की अनधिकृत याबाबत महापालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पुणे शहरात आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. अनेक जाहिरात फलक धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले असून भविष्यात एखादी दुर्घटना येथे घडू शकते, अशी भीतीही खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवावे आणि जाहिरात फलक अधिकृत असतील तर त्यांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, असे त्यांनी सांगितले.