पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केला. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यासंदर्भातील तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्याला फूट म्हणता येणार नाही. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली असून, त्यावरील उत्तर अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजबरोबर युती नाही. पक्षातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार-अजित पवार यांची उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाल्याचे पुढे आले होते. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी ही बैठक गुप्त नव्हती. चोरडिया आणि पवार कुटुंबीयांची कित्येक वर्षांपासूनची मैत्री आहे असे नमूद केले.