पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. मात्र, या मेळाव्याकडे अजित पवारांच्या दोन्ही आमदारांनी पाठ फिरविल्याने याची उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम सर्वत्र पोहचविण्यासाठी, तसेच मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण शहरातील सर्व पदाधिकारी यांच्यासह पक्षाच्या आमदारांना देण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांच्या गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दांडी मारल्याने त्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
सेंट्रल पार्क येथे हा मेळावा घेण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी, शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्षी भोसले, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, बाळासाहेब बोडके, रुपाली पाटील ठोंबरे, सदानंद शेट्टी, बंडू केमसे, महेश शिंदे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे या वेळी उपस्थित होते. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसेच बारा राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर पाठवावे, असे दोन ठराव या वेळी मंजूर करण्यात आले.
शहराध्यक्ष मानकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत अजित पवार यांच्याकडे शिफारस केल्याचे बाबूराव चांदेरे यांनी सांगितले. त्यानंतर मनोगत व्यक्त केलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मानकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली. हा संदर्भ घेत ‘माझी विधान परिषदेसाठी निवड व्हावी यासाठी मी हा मेळावा बोलविला नाही, तर आगामी विधानसभेची तयारी करण्यासाठी मेळावा बोलविला आहे, असे दीपक मानकर यांनी मनोगतामध्ये स्पष्ट केले.
महायुतीला ताकत द्यायची आहे. अजित पवार सांगतील तोच निर्णय पुण्यात घेतला जातो. आम्ही मनाने कोणताही निर्णय घेत नाही. यादीवर काम करा. बूथ कमिट्या तयार करा. प्रवक्ते सोडून कोणीही बोलू नका. अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. काम करतो त्यालाच पद दिले जाते. काम करणाऱ्यांचा सात बारा माझ्याकडे आहे’,असेही शहराध्यक्ष मानकर म्हणाले. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी ‘लाडकी बहीण योजनेची माहिती तसेच पक्षासह चिन्हाचा प्रचार करण्यावर अधिक भर द्यावा’,अशी सूचना केली.