राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर न करणे, पेट्रोल-डिझेलच्या दरात होत असलेल्या वाढीबरोबरच सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी मोर्चा काढण्यात आला. शेतकरी अडचणीत असतानाही दुष्काळ जाहीर करण्यास राज्य शासन मुहूर्ताची वाट पाहात आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी उपस्थित केला.

राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नेहरू मेमोरिअल हॉलपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळावा, दुधाला रास्त दर देण्यात यावा या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. मात्र ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असे राज्य शासनातील मंत्री सांगत आहेत. दुष्काळ जाहीर करण्यास एवढा वेळ का घेण्यात येत आहे? जलयुक्त शिवार योजनेतूनही काही साध्य झालेले नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.