राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड बालेकिल्ल्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, टोकाला गेलेले गटबाजीचे राजकारण आणि सुभेदारांमधील अंतर्गत धुसफूस यामुळे एकूणच पक्षाची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत आहे. अशा वातावरणाचे सावट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसावरही आहे. सद्य:स्थितीत नेहमीसारखा उत्साह नसल्याने पिंपरीत पक्षाची वाटचाल निरुत्साही वातावरणात सुरू असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीत मावळचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि शिरूरचे उमेदवार देवदत्त निकम या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शहरातून अपेक्षित मतदान झाले नाही. विधानसभेतही भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या मंडळींनीच आपले उमेदवार पाडले. पक्षात मोठी पडझड सुरू झाली. आता अनेक नगरसेवक व पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर आहेत. पद वाचवण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीशी वरवरचा ‘संसार’ सुरू आहे. योग्य वेळी त्यांचा ‘काडीमोड’ ठरलेला आहे. निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष योगेश बहल, युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, तो मंजूर करण्यात आला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गटबाजीचे राजकारण टोकाला गेले आहे. कोणी-कोणाला जुमानत नाही. एवढी कामे करूनही अपयश आल्याने ‘कारभारी’ अजित पवार नाराज आहेत, त्यामुळे ते शहरात येत नाहीत. अशा परिस्थितीत, पक्षाची यंत्रणा विस्कळीत आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त नेहमी विविध उपक्रम राबवण्यात येतात. मात्र, यंदा कोणामध्ये उत्साह नसल्याचे दिसते. बहल यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. अतिशय निरुत्साही वातावरण पक्षाची वाटचाल सुरू असल्याने त्याचे सावट वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर आहे.
राष्ट्रवादीतील विस्कळीत यंत्रणा अन् निरुत्साही वातावरण
आता अनेक नगरसेवक व पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर आहेत. पद वाचवण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीशी वरवरचा ‘संसार’ सुरू आहे. योग्य वेळी त्यांचा ‘काडीमोड’ ठरलेला आहे.
First published on: 09-12-2014 at 03:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp pcmc groupism sharad pawar birthday