लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे लोकसभेसाठीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल, याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पुणे लोकसभा मतदारसंघअंतर्गत सहा मतदारसंघाची जबाबदारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शहरातील मतदारसंघातील बूथनिहाय समितींच्या आढावा घेऊन बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवेल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही पुणे लोकसभेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे असे सांगत या मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे, याचा लेखाजोखा मांडला होता.
आणखी वाचा-पुणे: निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर केल्यास तिप्पट कर, जाणून घ्या कारण
पुणे लोकसभेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाल्यानंतर शरद पवार यांनी कोणी कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्रित बसून योग्य तो निर्णय घेतली. ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, तोच पुण्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे या वादावर पडदा पडला असे वाटतच असतानाच पुण्यातील आढावा बैठकीवेळी सहा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आजमाविण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा विषय अद्यापही संपलेला नाही. चर्चा करण्यात काही अयोग्य नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा- पुणेकरांची उद्याने ठेकेदारांकडे, ‘या’ उद्यानात जाण्यासाठी द्यावे लागणार पैसे
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्याकडे लोकसभेच्या सहा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून तुपे यांनी काम केले आहे. त्यामुळे पर्वती, शिवाजीनगर, कसबा, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरूड या सहा मतदारसंघातील ताकदीचा अंदाज घेण्यात येणार असून बूथनिहाय समित्यांचेही बळकटीकरण करण्याची जबाबदारी तुपे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.