भारतीय जनता पक्षासाठी कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांनीही कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात सहभागी होऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही जोरदार टक्कर दिली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २२ फेब्रुवारीला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होऊन मेळावे घेणार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर आता थेट शरद पवार प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. पवार यांच्यापूर्वी कसब्याच्या प्रचारात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेही कसब्यात प्रचारासाठी येणार आहेत.
हेही वाचा- कसबा पोटनिवडणुकीत आज ‘हे’ उमेदवार चक्क प्रचार करणार नाहीत; कारण…
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, की २० फेब्रुवारीला अजित पवार प्रचारासाठी कसब्यात येणार आहेत. तर २३ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे यांची रॅली होणार आहे. २२ फेब्रुवारीला सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत शरद पवार यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होणार आहेत.