पुणे : वर्षभरात केवळ पंधरा सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर दिवाळीचा फराळ करत या निर्णयाचा निषेध केला. आठ वर्षांपासून महागाईत वाढ होत असून सिलिंडरच्या दरातही सतत वाढ करण्यात आली आहे, असा आरोपही या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रवक्ता प्रदीप देशमुख, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, मनीषा होले, किशोर कांबळे, मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, उदय महाले, रोहन पायगुडे, संतोष हत्ते, गोरक्षनाथ भिकुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या स्वयंपाक घरातील अत्यावश्यक वस्तूंवरही वस्तू आणि सेवा कर केंद्र सरकराने लावला. सिलिंडरच्या किमतही केंद्र सरकारकडून वाढविण्यात आल्या. गॅस सबसिडी बंद करण्यात आली. आता एका कुटुंबाला वर्षात केवळ पंधरा सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा : डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे मानद सदस्यत्व
मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी महागाई वाढवली जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जगायचे कसे असा प्रश्न पडला असल्याचा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडत त्यावर दिवाळीचा फराळ तयार केला. ऐन दसरा – दिवाळी या सणासुदीच्या काळात हा नियम करत गरिबांचा गॅस पळविला असल्याने या वर्षी चुलीवर फराळ करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने त्वरित ही वाढलेली महागाई कमी करावी आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.