राज्य सरकारने दहीहंडीचा क्रिडा प्रकारामध्ये समावेश केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गात नाराजी पाहण्यास मिळाली. त्याच दरम्यान भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विटी दांडू खेळणाऱ्याला देखील आरक्षण देण्यास काही हरकत नसल्याची भूमिका मांडली होती. या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात विद्यार्थी आणि राज्य सरकारचे विरोधक आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज पुण्यातील फर्ग्युसन रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विटी दांडू, गोट्या, सापशिडी, भोवरा, तर महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, विश्वासघात आणि ५० खोके घेऊन राज्यात ‘ईडी’ सरकार आलं आहे. या सरकारने मागील ४० दिवसांत शेतकरी, सर्व सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निर्णय घेतले नाहीत. केवळ घोषणाबाजी करण्यात हे ‘ईडी’ सरकार व्यस्त आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी खेळणाऱ्यांना नोकरीत आरक्षण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटी दांडू खेळणाऱ्यास देखील आरक्षण देण्यास काही हरकत नाही, असे विधान करून गेली अनेक वर्ष स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याचा अपमान केला आहे. तसेच, या ‘ईडी’ सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp protested against the state government by playing the games of viti dandu gotya sapshidi and mangalaguri msr 87 svk