पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ उमेदवार विजयी तर ३ जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून विशेष चर्चेत राहिली. हवेली तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी अनेक वेळा मेळावे आणि बैठकादेखील घेतल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल अगदी सहज निवडून येईल असे वाटत होते. त्याच दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी स्वतंत्र पॅनल तयार केला.
विकास दांगट यांच्या पॅनलमध्ये सर्व पक्षीय उमेदवार होते. त्यामुळे ही निवडणूक विशेष अर्थाने चर्चेत राहिली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची हकालपट्टी करीत असल्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयानंतर गारटकर आणि दांगट या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.
हेही वाचा – पुणे: ग्रामपंचायत मतदार संघात दोन्ही पॅनेलला प्रत्येकी दोन जागा
या सर्व घडामोडीदरम्यान हवेली कृषी उत्पन्न बाजर समितीची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी सहकार पॅनलमध्ये १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सेवा सहकारी संस्था गटातील ११ जागा, ग्रामपंचायात गटात ४, व्यापारी व आडते गटात २ आणि हमाल, मापाडी गटातील १ जागेसाठी मतदान पार पडले. व्यापारी गटात १३ हजार १७४ मतदार, हमाल, तोलणार गटात २ हजार ७ मतदार, सहकारी सेवा संस्था गटात १९१८ मतदार आणि ग्रामपंचायत गटात ७१३ मतदार असे एकूण १७ हजार ८१२ मतदारांची संख्या आहे. तर त्यापैकी १२ हजार ८७७ जणांनी मतदान केले आहे. त्यामुळे एकूण ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे.
त्यानंतर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीदरम्यान सुरवातीपासून राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरच होते. त्यामुळे १८ पैकी १३ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले. तसेच ३ जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपाने धूळ चारली आहे. आता या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार नेमकी काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.