राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन अखिल ब्राह्मण महासंघाकडून मंत्रघोष करण्यात येत होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील स्वत: य़ेथे पोहोचल्या होत्या. यावेळी त्या बुके आणि केळी घेऊन तिथे दाखल झाल्या, मात्र यानंतर ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते तेथून निघून गेले.
रुपाली पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही धक्काबुक्की केली नाही. मी आंदोलन करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या महिला पदाधिकारी आमच्या रोहन नावाच्या पदाधिकाऱ्याच्या अंगावर गेल्या. तुमचं आंदोलन लोकशाही पद्धतीने परिसराच्या बाहेर करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बुके आणला होता. तसंच उपवास असल्याने केळी घेऊन आली होती. पण ते केळी न घेताच निघून गेले”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “त्यांनी लोकशाही पद्दतीने आंदोलन करावं. आमच्या ऑफिसमध्ये घुसून मंत्रोच्चार करण्यासाठी तुमची गरज नाही. अमोल मिटकरी यांनी दुखावणारं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. फक्त टिप्पणी केली आहे”.
तुम्ही त्यांच्या मागे पळालात यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “मी त्यांच्या मागे धन्यवाद आंदोलन केलं आणि केळी घेऊन निघून जा सांगितलं. ते पळून गेले त्याला मी काय करणार. लोकशाहीने आंदोलन केलं पाहिजे. मग पळून का गेले?”.
“आमचा परिसर सोडून आंदोलन करा एवढंच आमचं म्हणणं होतं. अमोल मिटकरी यांनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत. पण आनंद दवेसारख्या लोकांच्या कोणत्या भावना दुखावल्या जात असतील तर त्याला आम्ही काही करु शकत नाही. पण उगाच जातीय तेढ निर्माण केलं जात असून त्यात त्यांना यश मिळणार नाही,” असं रुपाली ठोंबरे यावेळी म्हणाल्या.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते.
दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.
“कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही”
“ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही”, असं मिटकरी म्हणाले आहेत.
“राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा…”
“मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचं मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे”, असं मिटकरी म्हणाले.