पुणे : महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख १९० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत सहा कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
आढळराव यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. तेव्हा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. आढळराव आणि त्यांच्या कुटुंबीयांची १२ कोटी ५१ हजार ६० रुपये जंगम मालमत्ता आहे, तर २७ कोटी ६७ लाख ४९ हजार १३० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर एक कोटी ५१ लाख १९ हजार ७२९, तर पत्नीवर एक कोटी ८० लाख ७६ हजार ९०४ रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून कला शाखेच्या प्री-डिग्रीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी व्यवसाय, शेती आणि सामाजिक कार्य करत असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे सहा लाख ४० हजार ६९३ रुपये, तर पत्नीकडे तीन लाख ५२ हजार १२० रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे विविध बँकांच्या बचत खात्यांत एक कोटी तीन लाख ६९ हजार ६१६ रुपये आहेत. रोखे, कर्जरोखे आणि समभाग यामध्ये सहा लाख ६८ हजार ४३५ रुपयांची गुंतवणूक आहे.
हेही वाचा…गुजरातमधून पांढरा कांदानिर्यातीला परवानगी हा महाष्ट्रावर अन्याय; शेतकरी संघटनेचा आरोप
विविध वित्तीय साधने, राष्ट्रीय बचत योजना, टपाल आणि जीवन विमा यात दोन कोटी सहा लाख ७८ हजार १९७ रुपयांची गुंतवणूक आहे. आढळराव यांनी तीन कोटी ८५ लाख ८९ हजार ५४३ रुपये विविध व्यक्ती आणि संस्थांना कर्ज आणि आगाऊ रक्कम स्वरूपात दिले आहेत. त्यांच्याकडे बोलेरो चारचाकी आहे. आढळराव यांच्या नावे चिंचोली आणि लांडेवाडी येथे ३१ लाख ९८ हजार ८३३ रुपयांची शेतजमीन आहे. घाटकोपर, विक्रोळी, पुण्यातील शिवाजीनगर येथे वाणिज्यिक इमारती आहेत. मुंबईतील पवई, पुण्यातील एरंडवणा, लांडेवाडी, मंचर, चिंचोडी येथे सदनिका आहेत.
हेही वाचा…समूह विद्यापीठ योजनेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद
दरम्यान, पत्नीच्या नावे विविध बँका, पतसंस्थांमधील बचत खात्यांत चार लाख ७९ हजार ४८६ रुपये आहेत. पत्नीने रोखे, कर्जरोखे आणि समभाग यामध्ये ४१ लाख २८ हजार ४५९ रुपयांची गुंतवणूक आहे. पत्नीच्या नावे ३० लाख ४३ हजार ९८८ रुपयांचा जीवन विमा आहे. पत्नीने व्यक्ती आणि संस्थांना कर्ज आणि आगाऊ रक्कम स्वरूपात एक कोटी १७ लाख ४६ हजार रुपये दिले आहेत. पत्नीकडे १५१ तोळे सोने, तीन किलो चांदी, हिऱ्यांचे दागिने असून त्यांची एकूण किंमत एक कोटी नऊ लाख ११ हजार ५०५ रुपये आहे. पत्नीच्या नावे चालू खात्यांत दोन लाख ९० हजार ३४० रुपये आहेत. पत्नीकडे लांडेवाडी, चाकण, चिंचोली येथे एक कोटी ७७ लाख २९ हजार १५० रुपयांची शेतजमीन आहे. लांडेवाडी येथे बिनशेती जमीन, तर मुंबईतील विक्रोळी येथे वाणिज्य इमारत आहे.