शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार विलास लांडे पावणेदोन लाख मतांनी पराभूत झाले. मात्र, थोडय़ाच कालावधीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले, या राजकीय चमत्काराचे कोडे गुलदस्त्यात आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि आमदार लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात सूचक पद्धतीने ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव निवडून आले. तेव्हा राष्ट्रवादीच्या मंडळींनी धनुष्यबाण चालवला होता. आढळराव आणि राष्ट्रवादीच्या ताकदीच्या नेत्यांची छुपी युती होती. पराभवानंतर लांडे यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या अहवालात बऱ्यापैकी माहिती नमूद केली होती. त्यामुळे ‘झारीतले शुक्राचार्य’ कोण, याची माहिती पक्षातील वरिष्ठ पातळीवर सर्वानाच झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर बंद खोलीतील या चर्चेला पुन्हा पाय फुटले आहेत. भोसरीतील मेळाव्याच्या निमित्ताने वळसे व लांडे यांनी सूचकपणे ही परिस्थिती मांडली. वळसे म्हणाले, लोकसभेत आपला उमेदवार सहाही मतदारसंघात मागे राहिला. विधानसभेत वेगळे चित्र होते. राष्ट्रवादीची शक्ती एकत्रितपणे वापरली असती तर असा विरोधाभास राहिला नसता. आमची ताकद गटातटात विभागली जाते, त्यावर मार्ग काढला पाहिजे. अडीच महिने राहिलेत, व्यूहरचना समजावून घ्या, जागोजागी मेळावे घ्या, विरोधी उमेदवाराची आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार, अशा विषयांवर चर्चा करू नका, शेजारच्या भागात डोकावू नका, नेमून दिलेले काम करा, अशा सूचना वळसेंनी केल्या. लांडे म्हणाले, माझा एक लाख ७० हजाराने पराभव झाला. भोसरीत २७ हजार, खेडमधून ५७ हजार, जुन्नरला ३२ हजार, आंबेगावात ३७ हजार, शिरूरमध्ये २० हजार आणि हडपसर मतदारसंघातून ४ हजार मतांची पिछाडी मिळाली होती. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार चांगल्या फरकाने निवडून आले, याचे कारण समजू शकले नाही. शरद पवार घाबरून दुसऱ्या मतदारसंघात गेले, असा अपप्रचार करण्यात आला. विकासाची कित्येक कामे करूनही ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले, याकडे लांडेंनी लक्ष वेधले.
उमेदवाराची शोधाशोध अन् साहेबांचा निर्णय
शिरूरसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही, अशी चर्चा होत असताना अनेकजण इच्छुक असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. उमेदवार कोण, याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. त्यापूर्वी, मतदारसंघात सर्व भागात मेळावे होणार असून स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येईल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल. कोणत्याही परिस्थितीत शिरूरचा खासदार राष्ट्रवादीचाच पाहिजे, असे त्यांनी बजावले आहे.

Story img Loader