पुणे : सुशिक्षित पदवीधर तरुणांना रोजगार मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कसबा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी रविवारी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी सेवेला फटका बसून सेवा दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आंदोलक नरेंद्र पावटेकर यांच्यासह काही आंदोलनकांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालून पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा पुरुष आणि दहा महिलांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) घेण्यात आली असून, प्रमुख आंदोलक नरेंद्र पावटेकर याची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली.
सुशिक्षित पदवीधर तरुणांना रोजगार मिळावा, प्रादेशिक परिवहन विभागाने वाहने उचलणे थांबवावे, शासकीय नियमन आणि कायदे सर्वांसाठी समान राहावेत या आणि अन्य मागण्यांसाठी कसबा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलन केले. मेट्रोच्या महानगरपालिका स्थानकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्वकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली नव्हती. आंदोलकांनी स्थानकातील मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन सुरू केल्याने मेट्रोची सेवा विस्कळीत झाली. या आंदोलनाची कल्पना मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली आणि मेट्रो सेवा थांबवावी लागली. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
आंदोलन सुरू झाल्यानंतर मेट्रो स्थानकात मोठा गोंधळ उडाला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मेट्रो स्थानकात तातडीने दाखल झाले. या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हुज्जत झाली. आंदोलन नरेंद्र पावटेकर याच्यासह अन्य काही आंदोलकांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दुपारनंतर मेट्रोची सेवा पूर्ववत
आंदोलनापूर्वी मेट्रोची पिंपरी-चिंचवड स्थानक ते स्वारगेट या दरम्याची सेवा सुरळीत सुरू होती. तर, रामवाडी ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते छत्रपती संभाजी महाराज उद्यान या दरम्यानही सेवा सुरू होती. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास आंदोलन सुरू झाल्यानंतर पावणेतीन वाजेपर्यंत सेवा खंडित झाली. तीननंतर सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली. तसेच, प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.
कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या आंदोलनात त्यांचा कधीच सहभाग नव्हता. या परिस्थितीत त्यांनी आंदोलन करून पोलिसांशी हुज्जत घातली. पुणेकरांची अडवणूक केली. हे आंदोलन व्यक्तिगत होते. त्यामुळे नरेंद्र पावटेकर याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
कोणतीही परवानगी न घेता आंदोलकांनी थेट मेट्रो सेवा ठप्प केली. पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणे, प्रशासनाला धमकावणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे असे प्रकार कोणत्याही स्तरावर खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास बळाचा वापर केला जाईल. अशा आंदोलकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
नोकरी देण्याचे आमिष
आरोपी नरेंद्र पावटेकर याचे सातारा रस्त्यावर मंदिर आहे. तेथे येणाऱ्या भक्तांना त्याने नोकरी देण्याचे आमिष दाखवून आंदोलन करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नरेंद्र पावटेकर याच्यासह त्याचे वडील, ११ महिलांसह २० जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.