राष्ट्रवादी म्हणजे ‘भ्रष्ट’वादी पक्ष असून ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असेच नाव त्यांना शोभते, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भोसरीत केली. आगामी निवडणुका पार पडल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. खासदार शिवाजीराव आढळराव, भोसरी शहरप्रमुख विजय फुगे, नगरसेविका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट आदींसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आदित्य यांनी युवकांशी व त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले, राज्यभरात फिरतोय. महायुतीला अतिशय चांगले वातावरण असून ४८ पैकी ४८ जागा जिंकू. देशात भगवी लाट असून जनतेला आता ‘भगवा’ हवा  आहे. राज्यात राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. जनतेच्या खिशातून ते पैसे काढून घेतात, तेच निवडणुकीत वाटतात. खोटे धरण आणि खोटे धोरण असलेले त्यांचे खोटे सरकार घालवू. शिरूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्यावर भगवा फडकवून तो लाल किल्ल्यावर लावायचा आहे. मावळचा उमेदवार लवकरच जाहीर करू. देशात व राज्यात सत्तापालट होणार असून आमचे खासदार व आमदार जनतेसाठीच काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविषयी आदित्यने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आजच्या ‘सामना’त सगळे आले आहे, अशी टिपणी त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा